नेपाळ हा आपला सख्खा शेजारी. या देशाच्या व आपल्या संस्कृतीत बरेचसे साम्य आहे. 2008 पर्यंत हा देश हिंदू राष्ट्र म्हणून ओळखले जात होता .त्यामुळे आपल्याला नेपाळ बद्दल अधिक ओढ आहे . देशाचे क्षेत्रफळ 147181 चौरस किलोमीटर .जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने 93 तर लोकसंख्येच्या दृष्टीने 42 वा असलेला हा देश. या देशाची लोकसंख्या 3 कोटी आहे. जरी हा देश चिमुकला असला तरी तो खूप भावणारा आहे. या देशात उंचच उंच इमारती नाही ,रेल्वे नाही पण येथील निसर्गाने व संस्कृतीने देशाला श्रीमंत केले आहे. साधेपणा ही या देशाची खासियत आहे. जगातील 14 उंच शिखरांपैकी आठ उंच शिखरे या देशात आहेत. 20000 फुटावरील 240 पर्वत शिखरे इथे आहेत. माऊंट एव्हरेस्ट (उंची 29028फूट) हे सर्वोच्च शिखर या देशात असल्यामुळे जगभरातून असंख्य गिर्यारोहक येथे येत असतात. त्यामुळे या देशाच्या पर्यटनात व परकीय चलन मिळण्यात खूप मोठा वाटा आहे. पर्यटकांना पण हेलिकॅप्टर राईड ने एव्हरेस्ट दर्शन घेता येते .सात राष्ट्रीय उद्यानाने हा देश संपन्न आहे.
हिमालयातील पर्वतरांगा, दऱ्या खोर्यांचा प्रदेश, ट्रेकिंग, राफ्टींग साठी अनेक गोष्टी इथे उपलब्ध आहेत. नेपाळी लोक कष्टाळू, उदार, धार्मिक वृत्तीचे व आतिथ्यशील आहेत त्यामुळे जगभरातून लाखो पर्यटक नेपाळ देशाला भेट देत असतात.
भारतीयांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे म्हणजे काठमांडू. येथील पशुपतिनाथ हे अर्ध ज्योतिर्लिंग. या दर्शनाशिवाय बारा ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण होत नाही असे म्हटले जाते. देशात 80 टक्के हिंदू आहेत तर 15 टक्के बौद्ध धर्मीय आहेत.
काठमांडू ही देशाची राजधानी .भारतातून येथे विमानाने येता येते वा गोरखपूर ते सूनौली बॉर्डर वरून पण येता येते. मात्र पासपोर्ट वा इलेक्शन कार्ड हे आवश्यक आहे .
इथे नक्की काय काय पाहायचं?
काठमांडू या राजधानीत अनेक गोष्टी पाहता येतात. पशुपतिनाथ मंदिराबरोबरच स्वयंभूनाथ मंदिर, 11 किलोमीटरवरील बौद्धस्तूप, चंद्रगिरी हिल्स, बसंतपूर दरबार स्क्वेअर, कोपन मॉनेस्ट्री, नमोबुध्दा, थमेल इत्यादी. येथील कॅसिनो पण मनोरंजनाचे उत्तम साधन आहे .
पोखरा नेपाळ मधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर .काटमांडू पासून 203 किमी. येथील फेवा सरोवर enjoy करण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. ह्या सरोवराच्या एका छोट्याशा बेटावर ताल बराही हे दुर्गादेवीचे मंदिर आहे. शांती स्तूप त्याला जागतिक पीस साइट म्हणून ओळखले जाते. हे डोंगरावर वसलेले बौद्ध स्मारक आहे. पुराण बाजार, पोखराचा जुना बाजार, विविध स्थानिक हस्तकलेसाठी प्रसिद्ध आहे. पोखरा इथे माउंटन म्युझियम आहे.
काठमांडू पोखरा मार्गावर मनोकामना देवीचे सुंदर मंदिर एका उंच पर्वतावर आहे तिथे रोपवे ने जाण्याची सुविधा उपलब्ध आहे. 7 राष्ट्रीय उद्यानांपैकी चितवन हे एक राष्ट्रीय उद्यान. 1973 साली चितवनची निर्मिती झाली व ते 953 चौकिलोमीटरच्या परिसरात पसरलेले आहे. या जंगलात एकशिंगी गेंडा, बंगाली टायगर, हत्ती, अस्वल असे 68 प्रकारचे प्राणी आढळतात. जीप सफारी, हत्ती सफारी कॅनोईंग याद्वारे वन्यजीवांचे सुरेख दर्शन होते. तर तराई भागातील थारु ग्रामीण भाग व थारू नृत्य यांचा आनंद आपण घेऊ शकतो.
खरेदीसाठी अनेक पर्याय पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत. पश्मीना शाल, कुकरी (चाकू सारखे हत्यार ), नदीतील गुळगुळीत गोठ्यामध्ये केलेले नक्षीकाम, नेपाळी इतिहासाची साक्ष देणाऱ्या वस्तू, कोरलेल्या बुद्धमूर्ती, हस्तशिल्प, आभूषणे, पाणीपट्टे, गरम कपडे इत्यादी. आपले 100 रुपये म्हणजे नेपाळी 160. मात्र येथे भारतीय 100 रुपयाच्या नोटा व कमी Denomination च्या नोटा चालतात.
निसर्ग सौन्दर्याने व विविधतेने नटलेल्या या चिमुकल्या देशाला प्रत्येकाने एकदा तरी भेट दिलीच पाहिजे.