कर्नाटक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर बंगळूर, म्हैसूर, जोग वॉटर फॉल येतो. बेलूर, हलेबीड ची मंदिर आठवतात. पण युनेस्को जागतिक वारसा स्थळांचा मान मिळालेली दक्षिण कर्नाटकातील दोन ऐतिहासिक रत्ने म्हणजे हंपी व बदामी. जी अद्वितीय आहेत. हंपी व बदामी ह्या दोन्ही ठिकाणांना समूह इतिहास आणि स्थापत्यशैलीचा वारसा लाभला आहे.
हंपी हे कर्नाटक राज्यातील तुंगभद्रा नदीकाठावर वसलेले एक अतिशय पुरातन शहर. हुबळी शहरापासून 167.5 किमी., विजापूर शहरापासून 216.6 किमी., तर होस्पेट शहरापासून फक्त १२ किमी अंतरावर आहे. हंपी ही १४ व्या ते १६ व्या शतकात विजयनगर साम्राज्याची वैभवशाली राजधानी होती. जगातील त्यावेळेचे एक श्रीमंत शहर. राजसत्तेचा इतिहास आणि कलात्मक समृद्धी यांचे अनोखे मिश्रण. हंपीचे प्राचीन संस्कृत नाव पम्पा असे होते. पुढील काळात त्याचा कन्नड भाषेत अपभ्रंश हम्पे किंवा हंपी असा झाला.
विजयनगर साम्राज्याच्या इतिहासात कृष्णदेवराय हा महत्वपूर्ण राजा होऊन गेला. त्यानेच हंपीला वैभव प्राप्त करून दिले. कालांतराने आता जरी ह्या शहराचे भग्नावशेष दिसत असले तरी इतिहासप्रेमी यांच्यासाठी इतिहास, वास्तुकला व संस्कृतीचा एक अनमोल खजिनाच आहे. हंपीत अनेक सुंदर सुंदर मंदिरे आहेत. त्यातील विजय विठ्ठल मंदिर हे भारतातील सर्वांत भव्य आणि शिल्पकलेने समृद्ध असे मंदिर आहे. भागवान विष्णूच्या विठ्ठल रुपाला समर्पित असे हे मंदिर विजयनगरच्या साम्राज्याच्या वैभवाचे प्रतीक मानले जाते. १५ व्या शतकात राजा देवराय द्वितीय याच्या काळात याची उभारणी झाली. या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे ग्रॅनाइट दगडातुन साकारलेले प्रसिद्ध दगडी रथ जो मंदिराच्या आकाराचा आहे. संगीत स्तंभ हे येथील दुसरे आकर्षण. हंपीतील अजून एक महत्वाचे आकर्षण म्हणजे विरुपाक्ष मंदिर. ७ व्या शतकातील हे मंदिर भगवान शंकरांना समर्पित असून त्यांची विरुपाक्ष रूपात पूजा केली जाते. १४ व्या शतकात सुमारे ५० मीटर उंचीचे ‘मुख्य प्रवेशद्वार’ (गोपुरम) हे स्थापत्यकलेचे अद्वितीय उदाहरण आहे. मंदिराच्या भिंती, छत, स्तंभावरील सजीव कोरीव कामामधून हिंदू पुराण कथेचे दर्शन घडते. याशिवाय लोटस टेम्पल, हत्तीशाळा, मातंगगिरीवरील सूर्योदय ही पर्यटकांची आवडती ठिकाणे आहेत.

इथे नक्की काय काय पाहायचं?
बदामी हे इ.स. 540 मध्ये चालुक्य साम्राज्याची राजधानी होती. इ.स. 540 ते इ.स. ७५७ मध्ये चालुक्यांच्या कारकीर्दीत बदामी येथे भव्य गुहा, किल्ले, मंदिरे, सरोवरे बांधली गेली. बदामीच पूर्वीच नाव वातापी. त्याचाच अपभ्रंश होऊन कालांतराने त्याचे नाव बदामी झाले. बदामीमध्ये शैव, वैष्णव आणि बौद्ध धर्माच्या परंपरेच दर्शन घडविणाऱ्या अनेक गुंफा आहेत. नटराजाची मोहक मूर्ती, अर्धनारी नटेश्वराचे शिल्प, हरिहर, महिषासुरमर्दिनी, विष्णूंचे दशावतार, पद्मपाणी, बुद्धाचे शिल्प आपल्या डोळयाचे पारणे फेडतील अशा सुंदर शिल्पांनी या गुंफा नटलेल्या आहेत. भूतनाथ मंदिर जेथे भगवान शंकराची उपासना होते व अगस्त्य सरोवर ही प्रमुख देखणी स्थळे आहेत. बदामी किल्ल्यावरून दिसणारा सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येत असतात.
बदामीपासून २२ किमी वर असलेल्या पट्टडकल येथे नागर (उत्तर भारतीय) व द्रविड (दक्षिण भारतीय) स्थापत्यशैलीचा मिलाप पाहता येतो. विरुपाक्ष, मल्लिकार्जुन व संगमेश्वर मंदिर ही येथील प्रमुख मंदिरे आहेत. पट्टडकल पासून १४ किमी असलेले ऐहोळे हे मंदिर-स्थापत्यकलेचे पाळणाघर म्हणून ओळखले जाते. अर्धवर्तुळाकार असलेले दुर्गा मंदिर व लाडखान मंदिर हे येथील प्रमुख आकर्षण आहेत. ऐहोळे हे शिल्पकला अभ्यासासाठी प्रसिद्ध आहे.
ऐहोळेपासून १०५ किमी अंतरावर विजापूर हे जगप्रसिद्ध ठिकाण आहे. येथील गोलघुमट हे जगातील एक आश्चर्य मानले जाते. तेथील व्हिस्परिंग गॅलरी प्रसिद्ध आहे. एका आवाजाचा सातवेळा प्रतिध्वनी ऐकू येतो हे या घुमटाचे विशेष आहे. इब्राहिम रौझा, बारकुमान मशीद, मलिक ए मैदान तोफ ही विजापूरची इतर ऐतिहासिक आकर्षणे आहेत.
भारताचा वैभवशाली वारसा प्रत्यक्ष अनुभवायचा असेल तर प्रत्येकाने ह्या पंच स्थळाचा अनुभव घेतला पाहिजे. कारण कला, संस्कृती, धर्म, शौर्य, आणि निसर्ग या पंचरसाचा अद्वितीय अनुभव आपल्याला इथे घेता येतो.